केएफसीच्या उपाहारगृहावर छापा

Foto

अन्न परवाना निलंबित; एफडीएची कारवाई
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने बीड बायपास, शाहनूरवाडी येथील सफायर फूड्स इंडिया लि. संचलित केएफसी (केएफसी) उपाहारगृहाचा अन्न परवाना तत्काळ निलंबित करण्यात आला आहे.
फेड फूड सेफ महाराष्ट्र या मोहीमे अंतर्गत कारवाईचा बडगा उचलला जात आहे. अन्न सुरक्षा अधिकारी पी. पी. सुरसे यांनी केलेल्या तपासणी अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी घेतलेल्या भेटी दरम्यान या उपाहारगृहात अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. गंभीर त्रुटींमुळे अन्नाचे संदूषण होऊन ग्राहकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकत असल्याचा निष्कर्ष प्रशासनाने काढला आहे. पदनिर्देशित अधिकारी तथा सहायक आयुक्त द. वि. पाटील यांनी तात्काळ निलंबनाचा आदेश जारी केला. निलंबन कालावधीत संबंधित आस्थापनेला अन्न तयार करणे, प्रक्रिया, विक्री आणि वितरण
यांसह ग्राहकांना पुरवठा करण्याचे सर्व व्यावसायिक कामकाज पूर्णपणे बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रशासनाकडून पुन्हा लेखी पुनर्स्थापना आदेश मिळेपर्यंत व्यवसाय सुरू करता येणार नाही, असे श्रीकांत करकळे यांनी स्पष्ट केले.
शाकाहारी-मांसाहारी एकत्रच
कच्चे व शिजवलेले अन्न, तसेच शाकाहारी व मांसाहारी अन्नपदार्थांचे योग्य विलगीकरण न ठेवणे, गरम व थंड अन्नाचे तापमान नियंत्रणात कमालीची हलगर्जी असणे, खाद्यतेलाचा तपासणी अहवाल आणि अन्न तपासणी प्रमाणपत्रे उपलब्ध नसणे, तसेच अन्न संपर्कात येणाऱ्या पॅकेजिंग साहित्याचे एनएबीएल प्रयोगशाळेचे प्रमाणपत्र नसणे अशा बाबी समोर आल्या आहेत. याशिवाय, अन्न वाढण्याचे साहित्य अस्वच्छ असणे, ड्रेनेजमध्ये कचरा साठणे, फरशी निसरडी असणे आणि कीटक नियंत्रणाबाबत आवश्यक नोंदी न राखणे अशा स्वच्छतेविषयक निकषांचे उल्लंघन झाल्याचेही तपासणीत उघड झाले आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions